Soybean Yellow Mosaic Disease : सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक (केवडा) रोगाचे असे करा व्यवस्थापन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Soybean Yellow Mosaic Disease : गेल्या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. पिवळा मोझॅक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना तर संपूर्ण पिकचं उपटून टाकावे लागले होते.

 

Soybean Yellow Mosaic Disease

 

पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस या विषाणुंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस (Soybean Yellow Mosaic Disease) या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यावर्षीच्या हंगामात बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये काही झाडे अचानक विशिष्ट प्रकारे पिवळी पडलेली दिसून येत आहेत ही पिवळी पडलेली झाडे म्हणजेच पिवळा मोझॅक (केवडा) या विषाणूजन्य रोगाने प्रादुर्भावग्रस्त झालेली झाडे आहेत. तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक (Soybean Yellow Mosaic Disease) या रोगाचा प्रादुर्भाव ही झालेला दिसून येतो आहे. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75 टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

 

 

रोगाची लक्षणे (Soybean Yellow Mosaic Disease)

हिरवा मोझॅक: यामध्ये झाडाची पाने ही जाडसर,आखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात. पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात. प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटते. हा विषाणू बियाणे व पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः मावा या रसशोषक किडीद्वारे केला जातो. (Soybean Yellow Mosaic Disease)

 

Soybean Yellow Mosaic Disease 1

 

पिवळा मोझॅक: सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो.

 

Soybean Yellow Mosaic Disease 2

 

नुकसानीचा प्रकार

दोन्हीही प्रकारच्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते.

 

व्यवस्थापन

त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच मावा व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.
सोयाबीनवरील मावा,पांढरी माशी आणि मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन

 

1. काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी.

2. पेरणीस निरोगी बियाण्याचाच वापर करावा.

3. लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.

4. मोझॅक(केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल. (Soybean Yellow Mosaic Disease)

5. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेडसी 50 मिली (2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा असिटामिप्रीड 25%+बाइफेन्थ्रीन 25 % डब्ल्यूजी 100 ग्रॅम (5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49%+इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली (7 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने)यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी.

6. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.

7. फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.

8. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारसीनुसारच करावा.9. मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे.

10. कमीत कमी पहिले 45 दिवस पीक तणमुक्त ठेवावे.

11. पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.

12. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.

 

मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी.

 

वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. मिसळून फवारणी केल्यास पिकाला अपाय होऊ शकतो तसेच कीडनाशकांचा अपेक्षित परिणामही दिसून येत नाही त्यामुळे ती आवश्यकतेनुसार वेगळी वेगळी फवारावी. तसेच लागोपाठ एकच एक कीटकनाशक वांरवार फवारू नये

 

फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी. 

 

डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ 02452-229000
📱व्हाटस्अप हेल्पलाईन- 8329432097

error: Content is protected !!