GMSASSAY Farmer Accident Scheme : स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास आर्थिक मदत देणारी महत्त्वाची शासकीय योजना आहे. या योजने अंतर्गत शेतकरी यांचा अपघाती मृत्यू किंवा दोन डोळे/दोन हात/दोन पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक हात/पाय निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते. (GMSASSAY Farmer Accident Scheme)
स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी सध्या असलेली ३० दिवसांची मुदत वाढवून ती १२० दिवस करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासन स्तरावर गती मिळण्याची चिन्हे आहेत.
या संदर्भातील आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (GMSASSAY Farmer Accident Scheme)
योजनेअंतर्गत अपघातानंतर सानुग्रह अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ३० दिवसांच्या आत अर्ज करावा लागतो. मात्र कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यावर संबंधित कुटुंब मानसिक, सामाजिक आणि आर्थिक संकटातून जात असते. (GMSASSAY Farmer Accident Scheme)
त्याचवेळी पोलीस पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, सातबारा उतारा, वारस प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील आदी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अनेकदा दोन ते तीन महिने लागतात. परिणामी अनेक पात्र लाभार्थी केवळ मुदत संपल्यामुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. याच पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्ज सादर करण्याची मुदत ३० दिवसांवरून किमान १२० दिवस करण्याची मागणी शासनाकडे केली होती.
तसेच संबंधित शासन निर्णयात आवश्यक सुधारणा करून सुधारित आदेश तातडीने जारी करावेत, कृषी कार्यालयांना आवश्यक सूचना द्याव्यात आणि ग्रामपंचायत, कृषी व महसूल यंत्रणेमार्फत योजनेची व्यापक जनजागृती करावी, अशीही मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेतल्यानंतर शासन निर्णयात आवश्यक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








